औरंगाबाद : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वच पक्षांना लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर एमआयएम-वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीकरिता जोरदार कंबर कसली आहे. खासदार इम्तियाज जलील यांना निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी एमआयएमच्या वतीने मिशन डोअर टू डोअर सुरू करण्यात आले आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात हे अभियान जोरात सुरू आहे.
या अभियानांतर्गत मतदारांचे आभार मानण्याच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माच्या लोकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न एमआयएम-वंचित बहुजन आघाडीकडून केला जात आहे. लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत चार वेळा खासदारपद भूषविलेले शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना पराभूत करीत एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील खासदार झाले. आता येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणूक होत आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्ष, संघटनांना विधानसभेचे वेध लागलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने हुरळून न जाता एमआयएम व वंचित बहुजन आघाडीने सातत्याने मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खा. इम्तियाज जलील यांना निवडून दिल्याबद्दल एमआयएम व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण पूर्व विधानसभा मतदारसंघात मिशन महाराष्ट्र, आपकी बार बहुजन की सरकार अशा आशयाची पत्रके वाटून मतदारांचे आभार मानण्यात येत आहेत. विधानसभेचा विचार केलास पूर्व विधानसभा मतदारसंघातून एमआयएम व वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. गफार कादरी यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. या पत्रकावर डॉ.कादरी यांचा पूर्व मतदारसंघातील उमेदवार म्हणून उल्लेखदेखील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पत्रकावर सर्व समाजातील संत व थोर पुरुषांची छायाचित्रे आहेत. 2014 मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ.कादरी यांचा पूर्व मतदारसंघातून थोड्या मतांनी निसटता पराभव झाला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्व मतदारसंघातून एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांना 92 हजार 347 एवढी मते मिळाली. या पार्श्वभूमीवर यावेळच्या विधानसभा निवडणुकीत पूर्व मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीने सध्या एमआयएम-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार तयारी केली जात आहे.